उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 अनेक वेळा उद्घाटन सोहळे होऊन देखील उस्मानाबाद मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील जनतेची शासनाबद्दल नाराजी असून, याबाबत परिवहनमंत्री म्हणून वैयक्तिक लक्ष द्यावे व यासाठी ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून हे काम शासन निधीतून हाती घेण्यात यावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.

परिवहन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील बसस्थानक, आगार यांची व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुनर्बांधणी करण्यासाठी ३० कोटी रुपये तसेच कर्जत येथे नवीन आगार उभारण्यासाठी आणि जामखेड येथे बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्यासाठी १४.८५ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या व अनेक वेळेस उद्घाटन सोहळे होऊन देखील प्रत्यक्ष कामास सुरुवात न झालेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी निधीच्या मागणीचा उल्लेख कुठेही दिसला नाही, याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

भव्य स्थानकाची गरज

उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून शिक्षण, बाजारपेठ व आरोग्य सुविधा इत्यादी कारणासाठी दरराेज अनेक नागरिक येथे ये-जा करत असतात. शहरात सध्या असलेल्या बसस्थानकाची दुरावस्था झाली असून पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची लक्षणीय संख्या लक्षात घेता सदर बसस्थानक अत्यंत छोटे व अपुरे पडत असल्याने या बसस्थानकाच्या जागी नवीन भव्य बसस्थानक उभे करण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

 
Top