उस्मानाबाद/ प्रतिनिधी

आळणी येथील प्राथमिक शाळेच्या पाहणीत या  शाळेचे कामकाज आणि शाळेचा परिसर समाधानकारक दिसून आल्याने या शाळेचे कामकाज इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी नुकतेच व्यक्त केले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी “सुंदर माझे कार्यालय” आणि “माझा गांव, सुंदर गांव” या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आळणी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी श्रीमती समृद्वी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,गटशिक्षणाधिकारी श्रीमती रोहीणी कुंभार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत ऐवळे व अन्य काही अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी शाळेचा परिसर,शाळेतील कामकाज व प्रयोगशाळा पाहण्यात आली. विद्यार्थ्यांशी हितगूज करण्यात आले.या शाळेतील गुरुजन वर्ग चांगल्या प्रकारे शिक्षण विषयक कामकाज करीत असल्याचे दिसून आले.अद्यावत प्रयोगशाळा, वृक्षारोपन, परिसर स्वच्छता इत्यादी कामकाज लोकसहभाग, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून होत असल्याची बाब तसेच गुरुजन वर्गात असलेला परस्पर समन्वय विचारात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शाळेचे कौतुक करुन इतर शाळांनीही असेच प्रेरणादायी काम करणे अपेक्षीत असल्याचे मत व्यक्त केले. “उद्याचा सृजन नागरीक घडविण्याची क्षमता शाळेत असल्याने शाळा ह्या सुंदर व परिपूर्ण असल्या पाहिजेत” असे ते म्हणाले.

 
Top