उस्मानाबाद, /प्रतिनिधी - 

 एक पोलिस बंदुकीचा धाक दाखवून वारंवार अत्याचार करत असल्याची चिठ्ठी लिहून येथील एका विवाहीत महिलेने 2 मार्च रोजी सदरील पोलिसांच्या बांधकामावर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील बार्शी नाका परिसरातील हनुमान चौकात घडली होती. यानंतर सदरील महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन संबंधित पोलिसाविरुध्द शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सदरील घटनेची नोंद घेत संबंधित पोलिसास निलंबीत केले असून त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱया हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याची चिठ्ठी लिहून या आरोपीच्याच बार्शी नाका परिसरातील हनुमान चौक येथे असणाऱया बांधकामावर एका विवाहीत महिलेने 2 मार्च रोजी सायंकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर सदरील महिलेच्या पतीनेही येथील शहर पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस कोळेकर याच्या विरुध्द फिर्याद दाखल केली होती. यानंतर 3 मार्च रोजी सकाळी शहर पोलिस ठाण्याच्यावतीने या पोलिसास अटक करण्यात आली होती.

जिल्हा पोलिस अधिक्षक राज तिलक रोषन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपी पोलिस हरीभाऊ भास्कर कोळेकर यास सेवेतून निलंबीत केले आहे. तसेच या प्रकरणी त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड हे करीत आहेत.

 
Top