उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबादेत जिल्हा मानवी आरोग्य निर्देशांकात सकारात्मक वाढ करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करून दिल्याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचा मदर तेरेसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या प्रेरणेतून प्राथमिक शिक्षण विभागाला प्रिंटर भेट देण्यात आला.

पूर्वी राष्ट्रीय कौटुंबीक पाहणी अहवालानुसार दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ ८२१ इतके होते. हा निर्देशांक उंचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सातत्याने पाऊले उचलून गुणोत्तर २२९ ने वाढून १०७० पर्यंत येऊन पोहचले. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून युद्धपातळीवर अंमलबजावणी करत डेंजर झोनमधे असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याने लिंग गुणोत्तराच्या बाबतीत राज्यालाही मागे टाकले. यामुळे कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. मदर तेरेसा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कल्याण बेताळे, सचिव महादेव शिंदे, संचालक मोहन भोसले, डी. डी. हुंडेकरी, प्रशांत भोसले उपस्थित होते.

 
Top