उमरगा / प्रतिनिधी : -

उमरगा पालिकेत पावणेदोन कोटी रूपयाच्या अपहार प्रकरणातील मास्टर माईड असलेल्या फरार पवन मात्रे याला उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२३) सोलापूर येथून अटक केली. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडील इनोव्हा कारही जप्त केली आहे.

उमरगा पालिकेत पहिल्यांदा ४९ लाखाच्या अपहारप्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटी झाली. पालिकेचे तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे, दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण यांच्यासह सचिन काळे, पवन बाबुराव मात्रे - सोमवंशी व नंतरच्या तपासात नंदकुमार झांबरे अशा सहा जणांची नावे अपहार प्रकरणात समोर आली होती. या प्रकरणात पहिल्यांदा कंत्राटी कर्मचारी ढवळे याला २२ ऑक्टोबरला अटक झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अपहारीत दहा लाख रुपये भरल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ महिन्याने दोन जूनला सचिन काळे, सुरज चव्हाण यांना अटक केली. त्यानंतर चव्हाण यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, न्यायालयाने अपहारीत रक्कमेतील दहा लाख २८ हजार रुपये भरण्याच्या अटीवर जामिन मंजूर केला. ती रक्कम त्यांनी पालिकेत भरली. काळे यांना २६ लाख भरण्याची अट होती. झांबरे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तेरा लाख ७० हजार रूपये भरल्यानंतर त्यांच्या जामिनाची प्रक्रिया झाली. दरम्यान अपहार झालेल्या पावणेदोन कोटीपैकी ३३ लाख ९८ हजार पालिकेत जमा झाले आहेत.आता पर्यत या प्रकरणातील सहा आरोपीपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी पवन म्हात्रे तत्कालीन लेखापाल वडमारे, पवन म्हात्रे दोघे फरार होते. 

 
Top