उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

निसर्ग नियमानुसार सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याने गावात गावात कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या मदतीने पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी, तसेच आपल्याबरोबर इतरांनाही प्रवृत्त करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केले आहे.

 पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.तेव्हा श्री.फड बोलत होते. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामाबरोबरच नैसर्गिक कर्तव्य व भूतदया म्हणून पशु-पक्षांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.

निसर्गात सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा अधिकार असल्याने आपल्यामुळे कोणाच्याही अधिकारास बाधा येणार नाही, तसेच कर्तव्याचा भाग म्हणून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत पशु-पक्षांसाठी चारा-पाणी स्वरूपात करावी. शासनाने मंजूर केलेल्या विहीर लाभार्थीच्या शेतात तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतीच्या बाजूला प्राण्यांसाठी ‘पाणवठे’ तयार करावेत. कृषी विभाग जिल्हा परिषद अंतर्गत तयार करण्यात आलेले पक्षांचे विसावे हा उपक्रम अतिशय चांगले आहे.या उपक्रमातून पक्षांना पाणी, चारा सोबतच विसावा मिळत आहे. ही एक प्रकारची भूतदया असून अशा उपक्रमातून पशु-पक्षांची जपवणूक होऊन निसर्गाचा समतोल राखण्याचे एक मोठे काम आपण करत असल्याचे डॉ. फड यांनी सांगितले.

 भर उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते व उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी पशुपक्ष्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. माणुसकीच्या नात्यातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात पशुपक्ष्यांसाठी किमान चार पाणवठे व किमान चार ठिकाणी पक्ष्यांच्या पाण्याची सोय करावी. तसेच पाणवठ्यावरील जास्तीचे होणारे पाणी याचा दुरुपयोग न करता पुनश्च शेतीसाठी उपयोगात आणणे, हेच जल दिनाचे उद्दिष्ट असून काटेकोर पाणी वापर करणे महत्त्वाचे आहे.

या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेटे,श्री. प्रमोद राठोड,जिल्हा कृषी अधिकारी व पंचायत समिती अंतर्गत सर्व कृषी अधिकारी(विघयो) उपस्थित होते.

 
Top