उमरगा / प्रतिनिधी : -

पेपर विक्री स्टाॅलवरील पेपर व मासिके घेऊन जाऊन मास्क घातले असताना ५०० रुपयाची पावती फाडणा-यांची चौकशी करुन दंडाची रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी उमरगा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील पेपर विक्रेत्यांना मास्क वापरुन गर्दी न करता पेपर विक्रीस परवानगी आहे. रविवारी (दि. २१) उमरगा बस स्टॅडसमोरील पेपर विक्री करणारी महिला तोंडाला मास्क बांधून स्टाॅलवर पेपर विक्री करीत होती. उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर हे स्वतः सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान पालिकेच्या शासकीय गाडीतुन आले. व स्टाॅलवरील सर्वच पेपरचे गठ्ठे व मासिके गाडीत टाकून घेऊन गेले. सदरील पेपर विक्री करणारी महिला साहेब, मी तर मास्क घातला आहे. स्टाॅलसमोर मुळीच गर्दी नाही‌. पेपर विक्रीला परवानगी आहे म्हणून मी पेपर विक्री करत आहे. आपण बंद करायला सांगितलो तर पेपर विक्री बंद करुन घरी जाते. पण पेपर घेऊन जाऊ नका. आमची ही रोजीरोटी आहे. अशी विणवनी करीत होती. परंतु मुख्याधिकारी यांनी त्यांचे न ऐकता पेपर व मासिके घेऊन गेले.

त्यानंतर सदर महिलेने ही बाब त्यांचे पती तानाजी घोडके यांना सांगितली. तेंव्हा तानाजी घोडके यांनी नगरपालिकेत जाऊन पेपर व मासिकाची मागणी केली. परंतु पाच हजार रुपयाची दंडाची पावती करण्याची सुचना देण्यात आली. याबाबत कांही पत्रकार बांधवानी जिल्हास्तरावर तर कांहीनी मुख्याधिकारी यांचेशी संपर्क साधला व पेपर विक्री करणाऱ्या महिलेने मास्क वापरले होते त्यामुळे दंड न करण्याची विनंती केली. परंतु पालिकेने ५०० रुपयाची दंडाची पावती केली आहे.

तरी पेपर वाटप करणेस व पेपर विक्री करणेस परवानगी द्यावी व सदरील पावती रद्द करुन त्यांचे पैसे परत  देण्याची मागणी करण्यात आली आहे. पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास व-हाडे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पत्रकार अविनाश काळे, बालाजी वडजे, समीर सुतके, अंबादास जाधव, गो. ल. कांबळे, अमोल पाटील, युसुफ मुल्ला, महादेव पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.

 
Top