उस्मानाबाद / प्रतिनिधी

  जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केल्यानंतर खासदार आेमराजे व आमदार कैलास पाटील यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संसदेच्या अधिवेशन काळात प्रयत्न करू, असे आश्वस्त केले. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची व्याजासह १० कोटी रक्कम थकबाकी देय बाकी आहे. भविष्य निर्वाह निधीचा विषय केंद्रीय स्तरावर असल्याने याबाबत केंद्रात पाठपुरावा करून मार्ग काढू, असे पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे कारखाने सुरू होण्याच्या दृष्टीने आणखी महत्वाचे पाऊल पडले आहे.

कारखाने चालू करण्यासाठी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे आवश्यक असल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी (दि.२)मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम बाबत मार्ग काढण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.त्यावर सदरील विषय केंद्र सरकारचा असून, संसदीय अधिवेशन ८ मार्चपासून चालू होत आहे. या काळामध्ये सदरील विषय मार्गी लावण्यासंदर्भात आपण संबंधितांची बैठक आयोजित करून विषय मार्गी काढू पवारांनी म्हटले आहे. तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला शासकीय थकहमीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला आहे. तो अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा, यासाठी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना फोन करून सूचना केल्या.यावेळी राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.


 
Top