उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 पुरवणी मागण्यांमध्ये सातारा, अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीसाठी आर्थिक मान्यता घेतली जात आहे. तसेच बारामती आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी ५० कोटींची मागणी केली आहे. मात्र उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचा पुरवणी मागण्यांमध्ये नामोल्लेखही नाही. ही बाब खेदजनक आहे, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे कळविले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालय आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन निर्णय आहे. उस्मानाबादच्या संदर्भात अशी अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. येथील प्रस्तावित शासकीय महाविद्यालयाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी डॉ. शेखर राजदेरकर यांची अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली, त्याबद्दल आपले आभार. मात्र अपेक्षित प्रक्रियेला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र पदभार देणे, मदतीसाठी आस्थापना निर्मिती करणे, जिल्हा कोषागारात वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे कोषागार खाते निर्माण करणे व पदनिर्मितीला मान्यता देणे आवश्यक असल्याचेही आमदार पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी मार्फत टर्न की तत्त्वावर करून घेण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उस्मानाबाद येथील महाविद्यालयाबाबत अशा प्रकारचा शासन निर्णय मात्र अद्यापही घेण्यात आलेला नाही. ही बाब उस्मानाबादसाठी अत्यंत खेदजनक असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

 
Top