उस्मानाबाद / प्रतिनिधी:

अंगणवाडी केंद्र हे बालकांवर सर्वांगीण सुसंस्कार करणारे केंद्र असल्याने या केंद्राची सुसज्जता ही बालमनावर प्रभावी संस्कार करण्यास सह्यकारी ठरते असे प्रतिपादन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी आज केले.

डॉ.फड यांनी अंगणवाडी केंद्रातील रंगरंगोटी, परसबाग, मुलांचे आहार वाटप, लसीकरण, सँम मँम मुलांची आरोग्य तपासणी,  सँम बालकांसाठी ‘ग्राम बाल विकास केंद्र’ गरोदर मातांना आहार व आरोग्य विषयी केले जात असलेले मार्गदर्शन, लसीकरण दिवस, कोरोना कालावधीमधील शिक्षण पद्धती,मुलांसाठीचे शैक्षणिक साहित्य, पक्षांसाठी केलेली चारा-पाणी व्यवस्था इत्यादी ची पाहणी करण्यासाठी उमरगा व तुळजापूर तालुक्यातील काही अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्या.

अंगणवाडी केंद्रातील अंतर्बाह्य सजावट, वृक्षारोपण, पक्षांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, शालेय पोषण आहाराचे वितरण इत्यादी बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त करताना यात आणखी जास्त प्रभावीपणा कसा आणता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील अंगणवाडी सेविकेने छोटासा तयार केलेले पुष्पगुच्छ स्विकारताना सेविकेने व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. त्यावेळी शबरी व श्रीरामाच्या भेटी सारखा हा योग्य आहे असे उपस्थितांतून वाक्य येताच सर्वांनी टाळ्या वाजून अंगणवाडी भेटीबाबत आनंद व्यक्त केला. उद्याचा सुजाण विद्यार्थी व देशांचा सुजाण नागरिक घडविण्यासाठीची जबाबदारी अंगणवाडी वर असल्याने अंगणवाडी केंद्रात काम करणाऱ्या सर्वांनी ‘आधी केले मग सांगितले’ अशा पद्धतीने वागण्याचे व बालमनावर अत्यंत चांगले व प्रभावी संस्कार करण्याची गरज असल्याचे सांगून ही गरज जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका चांगल्याप्रकारे पूर्णत्वास नेत असल्याचे दिसून येत आहे असेही   डॉ.फड म्हणाले.

 यावेळी डॉ. फड यांच्या सोबत अणदुरचे सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.आकांक्षा गोरे,ग्रामविकास अधिकारी डि.व्हि.चव्हाण, एमएसआरएलम चे समन्वयक समाधान जोगदंड,मेघराज पवार व शाळेचे मुख्याध्यापक यशवंत मोकाशे आदी उपस्थित होते.

 
Top