सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला परंतु काही वेळातच बिबट्या बेशुध्द होऊन मृत्यू पावला. या भागात प्रथमच बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी वन अधिकारी घोडके यांच्यासह पथक दाखल झाले असून,त्यांनी बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येईल असे सांगितले.

उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवर अंतरावर असलेला घाटंग्री शिवार डोंगराळ भाग असून,या भागात तसेच धाराशिव लेणी,हातलादेवी परिसरात जंगल आहे. मात्र या भागात याआधी कधीही बिबट्या आढळला नव्हता किंवा बिबट्याची चर्चाही नव्हती. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शिवारात बिबट्याने डरकाळी फोडली,त्यानंतर नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले.एका झाडाखाली बसलेला हा बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला.कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत गेली.पोलीस पाटील परशराम यादव व नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा केला असून,उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.


 
Top