उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यातील पोलीस पाटील यांच्या बाबतीत गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम 353 अन्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चव्हाणवाडी ता, तुळजापूर येथील पोलीस पाटील शत्रूघन चव्हाण यांना मारहाण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात 353 अन्वये राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, चव्हाणवाडी ता, तुळजापूर येथील पोलीस पाटील शत्रूघन हरिदास चव्हाण यांना गावातीलच विश्वनाथ उर्फ बाळू काशिनाथ चव्हाण याने शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच बोटाला चावा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली, सरकारी कामात अडथळा निर्माण केला, या प्रकरणी पोलीस पाटील चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात 353 अन्वये व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शासन अध्यादेश निघाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे एपीआय श्री, राऊत यांनी हा गुन्हा दाखल केला, यासाठी पोलीस पाटील संघाचे राज्य संघटक दिनकर पाटील, अमोल हिप्परगे, विजय वाघमारे, गुरुनाथ पाटील, आनंद हिंगमीरे यांनी पुढाकार घेतला,

पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास संबंधिताविरुद्ध भा,द,वि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश गृह विभागाचे पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना 3 मार्च रोजी दिले आहेत.

या निर्णयामुळे पोलीस पाटील यांनी समाधान व्यक्त करून या निर्णयाचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रदेश संघटक दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील यांनी स्वागत केले आहे.

 
Top