उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेमध्ये अजब डिस्ट्रिब्युटर्स कोल्हापूर यांचे वतीने भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक भीमा रसाळ, प्राचार्य आर.एस. देशमुख ,उपप्राचार्य पी. एन. पाटील, पर्यवेक्षक एस. डी. गायकवाड, पर्यवेक्षक एन. एम. देटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालय माणकेश्वरचे माजी मुख्याध्यापक भीमा रसाळ बोलताना म्हणाले की, मराठी ही आपली मातृभाषा असून इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे. आईची आणि मावशीची तुलना होऊ शकत नाही. आई ही आईच असते आणि मावशी ही मावशी असते. आईची बरोबरी मावशीशी होऊ शकत नाही.  मातृभाषेचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण असून इतर भाषा ही आपण ज्ञानाच्या दृष्टीने अभ्यासल्या पाहिजेत.परंतु मातृभाषेतूनच आपण शिक्षण व दैनंदिन व्यवहार पूर्ण करावेत. जोपर्यंत संस्कृती टिकून आहे. तोपर्यंत मनुष्य या भूतलावर राहणार असून जो पर्यंत माणूस जिवंत असेल तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहणारच आहे. परंतु आपल्या भाषेसाठी आपण प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. असे रसाळ यांनी आपले विचार मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एस. देशमुख यांनी इंग्रजी भाषेचा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आग्रह न करता  प्रत्येकाने आपल्या मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच करावे यावर आपले विचार मांडले. प्रसंगी प्रशालेतील मराठी विषय शिक्षकांचा गौरव अतिथींच्या हस्ते करण्यात आला. तर सहशिक्षक आनंद वीर यांनी  आपल्या स्वरचित कवितांचे वाचन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद. छत्रपती शिवाजी हायस्कूल उस्मानाबाद, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद व मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंडलिक पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन करून आभार आण्णासाहेब कुरुलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top