उस्मानाबाद / प्रतिनिधी : 

 तेरणा साखर कारखाना सुरू करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या रकमेची अट असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी खासदार ओमराजे यांच्या आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार बुधवारी दिल्लीत मंत्री संतोष गंगावार यांना भेटले.

दीड तासांची बैठक झाल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रकमेतून भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्याची अट घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोष गंगावार यांच्या कार्यालयाकडे दिला असून, भविष्य निर्वाह निधीचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा, ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने अडचणींवर मात कऱण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित पाठपुरावा करत आहोत. या कारखान्याच्या ३५ हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी तसेच त्यावर आधारित दीड हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी हा कारखाना सुरु होणे ही काळाची गरज आहे.

त्यातच यावेळी अत्यंत चांगले पर्जन्यमान झाल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा काळात हक्काचा कारखाना सुरु झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या अनुषंगाने शिष्टमंडळाने २ फेब्रुवारीला माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांची मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली होती. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार उपस्थित होते. तेव्हा पवार यांनी हा विषय केंद्रीय पातळीवर सोडविण्यासाठी दिल्लीला भेटण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपक जवळगे यांनी पवार यांची दिल्ली येथील सहा जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली.

त्यांनी केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोष गंगावार यांच्याशी बोलून बैठकीची वेळ निश्चित करुन दिली होती. त्यानुसार बुधवारी मंत्री गंगावार यांच्यासमवेत शिष्टमंडळाची बैठक श्रमशक्ती कार्यालयात पार पडली. दीड तासाच्या बैठकीत मंत्र्यांना कारखान्याचा विषय समजावून सांगितल्यानंतर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.भविष्य निर्वाह निधी विभागाचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या.


 
Top