उमरगा / प्रतिनीधी

जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणी विषयी तसेच तेरणा व तुळजाभवानी कारखान्याची शासनाकडून येणे असलेल्या थकहमीच्या रकमेविषयी व दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याच्या कार्यवाहीत मुख्यतः प्राँव्हीडंट फंड कार्यालयाकडून होणाऱ्या अडवणुकीच्या संबंधी खा. शरदचंद्र पवार यांची दिल्ली येथे   दि .१७ रोजी शिष्टमंडळाने भेट घेतली .

 या बैठकीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आ . राहुल मोटे, आ. कैलास पाटील, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अॅड .अभयसिंह चालुक्य, अॅड . दिपक जवळगे, यांची प्रमुख उपस्थिती होती .

 या भेटीमध्ये मुख्यतः प्राँव्हीडंट फंड कार्यालयाकडून होणाऱ्या अडवणुकीच्या संदर्भात व जिल्हा बँकेस येणे असलेल्या शासकीय थकहमी रकमेबाबत चर्चा करण्यात आली.या सर्व प्रक्रियेसाठी दिल्ली येथे संबंधित खात्याचे कामगार व श्रम मंत्री ना . संतोष कुमार गंगवार यांना खा . पवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून मार्ग काढण्याबद्दल सुचवले होते . खा . पवार यांच्या सूचनेनुसार सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय कामगार ,श्रम मंत्री ना . संतोषकुमार गंगवार यांची भेट घेतली व यावर मार्ग काढण्यासाठी ना . गंगवार यांनी संबंधित अधिकाऱ्यास प्राँव्हीडंट फंडाच्या अडचणीतून मार्ग काढन्याच्या सुचना केल्या .

 यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न असलेल्या तेरणा व तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याचा मार्ग सुकर होणार आहे . 

 
Top