उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यातून हस्तगत करण्यात आलेल्या ट्रक, ट्रॅक्टरसह ५८ वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.  दरम्यान सात दिवसात संबंधित वाहनधारकांनी वाहने घेऊन जाण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी केले असून त्यानंतरही वाहने कोणी घेऊन जाण्यासाठी न आल्यास लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. 

बेंबळी पोलिस ठाण्याअंतर्गत घडलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये व घटनांमध्ये अनेक वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. यामधील जवळपास सर्वच वाहने बेवारस स्थितीमध्ये पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. यामध्ये बुलेट, हिरोहोंडा, राजदुत, पल्सर अशा नावाजलेल्या कंपनीच्या  ५३ मोटार सायकल्स,  एक महिंद्रा डी आय कंपनीचा ट्रॅक्टर, एक मिनिडोर टमटम, बजाज कंपनीची काळीपिवळी रिक्षा, बजाज कंपनीची रिक्षा,  लिलँड कंपनीची सहा चाकी ट्रक आदींचा समावेश आहे.  अशी वाहने अनेक दिवसांपासून बेंबळी पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत पडून आहेत. यामुळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सात दिवसाच्या आत संबंधित वाहनधारकांनी पोलिस ठाण्यात ०२४७२ २३५०३३ तसेच व्यक्तिगतरित्या ८८५००४९२७० या क्रमांकारवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सात दिवसांमध्ये संपर्क न साधल्यास संबंधित वाहनमालकांना वाहने ताब्यात घेण्यासाठी इच्छा नसल्याचे गृहित धरून  वाहनाचा कायदेशीर लिलाव करण्यात येईल. लिलाव करून आलेली रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे. लिलावात घेण्यात आलेली वाहने संबंधितास कायदेशीर रित्या हस्तांतरित करण्यात येणार आहेत. लिलावाची तारीख नंतर जाहीर करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी सांगितले.

 
Top