तुळजापूर / प्रतिनिधी- 

 केश कर्तनाचे पैसे मागितल्याच्या वरुन मातेफिरूंनी धुडगूस घालत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे रमेश व नंदकुमार रमेश वाघमारे हे दोघे पिता- पुत्र  शुक्रवार दि.26 फेब्रुवारी रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गावातील आपल्या केश कर्तनालय दुकानात होते. 

यावेळी नमूद पिता- पुत्रांनी गावकरी- शुभम दत्तात्रय वडणे यांना केश कर्तनाचे पैसे मागीतले असता शुभम यांनी चिडुन जाऊन त्या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शुभमचा मित्र सचिन शशिकांत कुटार याने नंदकुमार यांच्या डोक्यात धारदार बतईने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच केशकर्तन दुकानावर व दुकानासमोरील मोटारसायकलवर दगड मारुन मोठे नुकसान केले. अशा मजकुराच्या नंदकुमार वाघमारे यांनी 27 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top