उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील गेट बंधारे तसेच तलाव दुरुस्तीच्या कामांसाठी १२ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये कळंब तालुक्यासाठी नवीन कामांसाठी ११ कोटी चार लाख तर मतदारसंघातील उस्मानाबाद तालुक्यातील गावांसाठी एक कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली. निधी वितरणात कळंब तालुक्याला झुकते माप मिळाले असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येत आहे.

कळंब तालुक्याला निधीच्या बाबतीत दुय्यम स्थान मिळत असल्याची ओरड नागरिकांची असायची, विशेष म्हणजे जिल्हा स्तरावरील नेते मंडळी कळंब तालुक्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कळंबचा विकासाचा बॅकलॉक भरत नव्हता. मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन निधीची मागणी करण्यात येत आहे. त्याची दखल घेत महाविकास आघाडीच्या सरकारकडून निधी मंजुर करून घेण्यात आमदार कैलास पाटील यांना यश आले आहे. नवीन कामासाठी कळंब तालुक्यात ११ कोटी चार लाख तर मतदारसंघातील उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी १२ लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. नवीन कामामध्ये कळंब तालुक्यातील मोहा, मंगरुळ, शेळका धानोरा, सौंदना (ढोकी), भाटशिरपुरा, देवधानोरा, बोरवंटी, वाठवडा, नायगाव, खामसवाडी, आथर्डी, भाटसांगवी, ईटकुर, खडकी, वाकडी, बोरगाव धनेश्वरी तर उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा, दुधगाव, तडवळा येथे गेट असलेले सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये कळंब तालुक्याला झुकते माप देण्यात आले आहे.

याच प्रमाणे भविष्यात निधीच्या बाबतीमध्ये कळंब तालुक्याला झूकते माप मिळाले तर कळंब तालुक्याचा विकासाचा मागासलेपणा पुसून जाणार आहे. या सर्व कामासाठी माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही पाठपुरावा केला होता. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रती आमदार घाडगे पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


 
Top