उस्मानाबाद/ प्रतिनिधी

पूर्वापार वहिवाटीचा अडविलेला रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीची दखल मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाने घेवून हा रस्ता खुला करून दिला आहे. तालुक्यातील बामणी येथील मंडळ अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या अर्जाची दखल घेत महिनाभरात नव्याने हा रस्ता सुरू करून दिला आहे.

तालुक्यातील बामणी येथील शेतकरी किशोर बापू लांडे, अतुल रमेश लांडे व कमलाकर गुंडाप्पा लांडे यांनी आपल्या शेताकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध नव्हता. जमीन गट नं. 291 व 293 च्या सरबांधावरील दक्षिण बाजूकडील पूर्वापार वहिवाटीचा पूर्व-पश्चिम असलेला रस्ता गट नं. 290, 346, 347, 350, 344, 295 व 342 मधाील शेतकर्‍यांनी अडविलेला असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. अर्जदारांनी अ‍ॅड. डी. एन. सोनवणे यांच्यामार्फत तहसीलदारांकडे अर्ज देवून अडविलेला हा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. या अर्जाची दखल घेत तहसीलदारांच्या निर्देशानुसार बामणी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी व्ही. बी. काळे, तलाठी एस. एस. कानडे यांनी स्थळ पाहणी केली व नंतर जेसीबीच्या सहाय्याने शेतकर्‍यांनी अडविलेल्या रस्त्यातील अडथळे दूर करून हा रस्ता खुला करून देण्यात आला. त्याबद्दल अर्जदार शेतकर्‍यांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर झाली आहे. यासाठी अर्जदारांच्यावतीने प्रशासनाकडे अ‍ॅड. डी. एन. सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता.

 
Top