उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह सहव्याधिग्रस्तांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु दिव्यांग बांधवांना इतर व्यक्तींप्रमाणे नोंदणी करत नंबर आल्यावर लसीकरण केंद्रावर जावून लस घेण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्याने लस उपलब्ध करुन देण्यासह त्यांना लसीकरणाची घरपोच सुविधा देण्याची मागणी भाजपच्या दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

यासंबंधी सोमवारी (दि.८) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिव्यांग बांधवांना चालता येत नाही तर काहिंना दिसत नाही. त्यामुळे त्यांना कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी इतरांवर अवलंबुन राहावे लागत आहे.

लसीकरणासाठी पोर्टल व कोविन अॅपवर नोंदणी व कागदपत्र सबमीट करणे अनेक दिव्यांग बांधवांना जमण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी नोंदणी सुविधा सोपी करावी. निवेदनावर भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक समाधान मते, जिल्हा सहसंयोजक विठ्ठल गायकीवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती मुंढे आदींच्या स्वाक्षरी आहेत. तालुक्यात व देशातही कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने लस घेणे आवश्यक आहे.

 
Top