उमरगा/ प्रतिनिधी:

उमरगा शहरातील पतंगे रस्त्याचे रेंगाळलेले काम अंदाजपत्रकानुसार तात्काळ सुरू करावे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारीचे कामाला निधी उपलब्ध करून गटारीचेही काम करण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी (दि.९) शहरातील पतंगे रस्त्यावरील नागरिकांनी नगराध्यक्षाना घेराव घातला व निवेदन दिले.

पतंगे रस्त्याच्या डांबरीकरणाचे २ वर्षांपूर्वी निविदाप्रक्रिया झाली होती. २०१९ साली ऐन पावसाळ्यात या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली पण पावसाळा सुरू असल्याने काम सुरू करता आले नाही. त्यानंतर गुत्तेदाराने वेळेत काम सुरू न केल्याने कामाची मुदत संपली होती त्यामुळे पतंगे रोडच्या डांबरीकरणचा विषय रेंगाळत गेला. अखेर रोडचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी पूर्वीचा कार्यरंभ आदेश रद्द न करता संबंधित गुत्तेदारास मुदतवाढीचे पत्र द्यावे  असा ठराव पालिकेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दलित वस्ती सुधार योजनेतून हे काम करण्याचे कार्यरंभ मुदतवाढीचे आदेश 23 डिसेंबर 2020 रोजी काढले. त्यानंतर सदर रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदाराने इस्टीमेटनुसार रस्ता न खोदता पूर्वीच्याच रस्त्यावर खडी व मुरूम टाकून दबई केली आहे. याला महिना होत आहे पण पुढील डांबरीकरण करणे या गुत्तेदाराने थांबविले असून या रस्त्यावरून सध्या वाहने जात असताना प्रचंड धूळ उडत असून रस्त्याच्या बाजूच्या दुकाने व घरात ही धूळ साचत असून लहान मुले व वयोवृद्ध यांना श्वसनाचा मोठा त्रास होत आहे. शेवटी त्रस्त नागरिकांनी मंगळवारी दि.9 रोजी नगरपालिकेत नगराध्यक्षाना घेराव घातला. व समस्या सांगितले. सदरचा रस्ता खोदून डांबरीकरण व दोन्ही बाजूच्या गटारी कराव्यात तेही तात्काळ अशी मागणी केली. यावेळी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी या नागरिकांना रस्त्याचे डांबरीकरण लवकरच सुरू होईल व रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी बांधकाम करण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाला असून लवकरच त्याची निविदप्रक्रिया करून गटारीचे ही काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांनी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना निवेदन दिले.या निवेदनावर धनराज गिरी,चित्तरंजन चौगुले,किरण रामतीर्थे, शरद पाटील, शिवप्रसाद लड्डा, अशोक माणिकवार, उद्धव साठे,संजय सोनकावडे, पंकज मोरे, अजिंक्य गाढवे, आकाश चव्हाण आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.

 
Top