झोपेतून उठवल्यामुळे केली होती काठीने बेदम मारहाण


 

बेंबळी/प्रतिनिधी - येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला उस्मानाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये एका वृद्धाला झोपेतून उठवल्याच्या कारणावरून काठीने बेदम मारहाण करण्यात आली होती.  

सुंभा गावातील मारूतीच्या मंदिरात  बालाजी नवनाथ सरवदे हा झोपला होता. त्याला बाबुराव बुर्ले यांनी उठवले असता सरवदे याने शिवीगाळ करून भांडण तकारी करून  बुर्ले यांच्या मुलीच्या समोरच  डोक्यात काठीने मारून गंभीर दुखापत केली.बुर्ले यांची मुलगी वैशाली चरण वाघमोडे यांनी यांनी त्यांना मुरूड येथे आणले. तेथून लातूरला उपचारासाठी नेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार १९ मे २०१६ रोजी दुपारी दोनला घडला.  याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात  बालाजी नवनाथ सरवदे (वय. २३ वर्षे रा. सुंभा) याच्यावर ३०२, ५०४ अन्वये गुन्हा नोंद होवुन पोलिस उपनिरीक्षक एन.आर दंडे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला.   
प्रकारणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र  देशमुख  यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले.   प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्यावतीने मृत व्यक्तीच्या मुलीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणुन पुरावा  देण्यात आला. सदर प्रकरणामध्ये आरोपीच्यावतीने असा बचाव घेण्यात आला की, मयत बाबुराव बुर्ले यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते सतत स्वत:हुन उठण्याचा प्रयत्न करत असताना पडुन त्यांना मार लागलेला आहे.  हॉस्पिटलमध्ये उपचार करत असताना योग्य रित्या ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु अभियोग पक्षाच्यावतीने मा.न्यायालयासमोर देण्यात आलेला पुरावा व महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून   जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी  सरवदे  याला दोषी ग्राहय धरून त्यास  जन्मठेपेची शिक्षा व रु.३०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद  सुनावली आहे.
 
Top