रासायनिक खताच्या वाटपाच्या संनियंत्रणासाठी भरारी पथकांची स्थापना

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कृषी विभागाने खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होवू नये म्हणून, आतापासून नियोजन केले आहे.उस्मानाबाद जिल्हयासाठी 63 हजार मे. टन खतसाठा मंजूर झाला आहे. पॉस मशिनवर ऑनलाईन पध्दतीनेच खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर आठ भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकामार्फत खतांच्या वाटपा बाबत सनियंत्रन करण्यात येणार आहे.

  उस्मानाबाद जिल्हयात खरीप हंगामात साधारणतः सहा लाख हेक्टरवर पेरणी होते. यामध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या पीकाची होत असते.त्याची सरासरी 3.74 लाख हेक्टर क्षेत्र असते. 2021 मधील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागातर्फे आतापासूनच केले जात आहे. यावर्षी युरीया, डीएपी,एमओपी,एनपीके, एसएसपी या प्रकारातील खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

 आगामी खरीप हंगाम 2021 साठी 63 हजार मे. टन खतसाठा शेतक-यांसाठी उपलब्ध होणार आहे.खतासंदर्भात शेतक-यांची फसवणूक होऊ नये, एम.आर.पी नुसारच विक्री व्हावी, या करीता पॉस मशिनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करावी. कृषी सेवा केंद्रामार्फत आधारकार्ड धारकांनाच खत विक्री करणे बंधनकारक आहे. शेतकरी बांधवानी खत खरेदी करत असताना आधार कार्ड सोबत ठेवावे. कृषी सेवा केंद्राकडून शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून दुकानाच्या दर्शनी भागात उपलब्ध खतसाठच्या बाबतचा फलक किमतीसह लावण्याच्या सूचना कृषी सेवा केंद्र चालकांना देण्यात आलेल्या आहेत.      

 खतासंदर्भात शेतक-यांना तक्रार,अडचण असल्यास त्याची निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय कृषी विभागाकडे संपर्क केल्यास तक्रारीचे निराकरण केले जाईल. तसेच कोणत्याही अडचणी आल्यास टो फ्री नं. 1800-2334-000 या नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परिक्षण करुनच जमीन आरोग्य पत्रिका प्राप्त शिफारशी प्रमाणे रासायनिक खताचा वापर करावा.असे आवाहन सभापती (कृषी व पशुसंवर्धन)आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि पंचायत समिती येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा. नोट- उपलब्ध होणारा खत साठा (मे.टनामध्ये) असा-

 युरीया-17320,डी.ए.पी.-19720,एम.ओ.पी.-2110,एन.पी.के.-19370,एस.एस.पी.-4670 असे एकूण-63190

 
Top