उमरगा / प्रतिनिधी-

बॅकेत बनावट शिक्याने बनावट खाते उघडून   अपहार, व मर्जीतील लोकाना टेंडर देणे आदीसह  विविध अपहाराच्या महापूराने प्रकाशझोतात आलेल्या

उमरगा नगरपालिकेत सत्ताधारी काॅग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण २४ नगरसेवकांनी नगराध्यक्षाविरुद्ध साडेतीन महिन्यांपूर्वी अविश्वास ठरावावर एका दिवसात सहया केल्या होत्या. मात्र अविश्वासाचे चक्रीवादळ कोणत्या  मुद्दयावर मिटले याबाबत शहरवासीयांत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्याना याचा जाब द्यावा लागणार आहे. 

 उमरगा नगरपालिकेत काॅग्रेस व भाजपाची सत्ता आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. काॅग्रेसच्या तिकीटावर सौ. प्रेमलता टोपगे या जनतेतून नगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या होत्या. काॅग्रेसचे ८, भाजपाचे ७, शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे एकुण २२ नगरसेवक आहेत. तर दोन स्विकृत नगरसेवक आहेत.  पालिकेत बहुमत नसलेल्या काॅग्रेसने निवडणुकीनंतर भाजपला उपनगराध्यक्षपद देऊन आघाडी केली. काॅग्रेस व भाजपाच्या युतीनंतर उपनगराध्यक्ष पदाची माळ भाजपाचे हंसराज गायकवाड यांच्या गळ्यात पडली होती. विविध विकास निधीची विभागणी, विविध टेंडर यासह विविध कारणावरुन चारही पक्षात सतत धुसफूस सुरू होती. निधी वाटपावरुन सर्वच पक्षात धुसफूस होऊन सतत गटबाजी दिसुन येत होती. मुख्याधिका-यांच्या नावे बनावट शिक्के बनवून, बॅकेत बनावट खाते उघडून  भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.   अखेर सर्व नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांसोबत चर्चा करुन नगराध्यक्षावरच अविश्वास ठराव दाखल करण्यावर एकमत झाले. नगराध्यक्षा   यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय निवडून आलेले २२ व २ स्विकृत अशा २४ नगरसेवकांनी १९ आक्टोंबर २०२० रोजी एका दिवसात सहया केल्या. एका दिवसात सर्वच पक्षांच्या संपूर्ण नगरसेवकांच्या सहया पूर्ण होतात मग दाखल करण्यासाठी कोणत्या मुहुर्ताची गरज आहे ? सहया होऊन साडेतीन महिन्याचा कालावधी लोटला परंतु अदयाप हा प्रस्ताव दाखल झाला नसल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रस्ताव दाखल करावयाचाच नव्हता तर सहया घेण्याचे कारण काय ? नेत्यांना न जुमानणा-या पदाधिकाऱ्याबद्दल नरमाईचे धोरण कशासाठी ? सहयांच्या मोहिमेचे गौडबंगाल काय ? का केवळ दबाव आणण्यासाठी तर हा खटाटोप नव्हता ना ? याबाबत शहरवासीयाकडून असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराचा महापूर, मनमानी, गटबाजी, नगराध्यक्ष व नगरसेवकातील वितंडवादामुळे शहराचे खुप मोठं नुकसान झाले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणा-या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता याचा जाब विचारण्यासाठी राहणार नाही हे मात्र नक्की.

 
Top