उस्मानाबाद/ प्रतिनिधी

एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आरोग्य विभाग कोरोना आजाराच्या प्रतिबंधा सोबतच कोरोना व्यतिरिक्त इतर आरोग्यविषयक कार्यक्रम राबवित आहे.इतर कार्यक्रमांमध्ये कुटुंब कल्याण हा महत्त्वाचा कार्यक्रम कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये राबविण्याचे आव्हान स्वीकारले आहे.यासाठी विशेष खबरदारी बाळगत आरोग्य विभागामार्फत कोंड येथे 21 महिलांवर कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

 उस्मानाबाद तालुक्यामधील कोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे दि. 19 मार्च 2021 रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 21 महिलांवर कुटुब कल्याण लॅप्रोस्कोपी पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये घ्यावयाच्या खबरदारी बाबत दिलेल्या सूचनांचे पालन करत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे आणि जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किसन लोमटे यांनी शिबिराचे आयोजन केले.     

 कोरोनाच्या अनुषंगाने विशेष खबरदारी म्हणून शस्त्रक्रियेसाठी दाखल सर्व महिलांची एक दिवस आधी कोरोना रेपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली. याच बरोबर शस्त्रक्रियापूर्व तपासणी वैदयकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. या दरम्यान मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षित अंतर राखणे या बाबींचे पालन कर्मचाऱ्यांनी केले.पुणे येथील राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालयातून एकावेळी शिबिरातून 30 शस्त्रक्रिया करण्याची कमाल मर्यादेनुसार कोंड येथे 21 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

 या शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन डॉ.कुलदीप मिटकरी यांच्या हस्ते  करण्यात आले.लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ.बंदखडके यांनी या शस्त्रक्रिया केल्या.शिबिर आयोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी कोंड प्राथमिक आरोग्य केंदामधील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.याच धर्तीवर जिल्हयामध्ये इतर तालुक्यांमध्येही अशी शिबिरे घेण्यात येणार आहेत.यात कळंब तालुक्यामध्ये, दहिफळ, मोहा, मंगरुळ, भूमध्ये वालवड, तुळजापूर तालुक्यातील अणदूर,जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर तालुक्यांमध्ये देखील कुटुंब कल्याण शिबिरे नियमित घेतली जातात.


 
Top