उस्मानाबाद  / प्रतिनिधी- 

तब्बल 20 कोटी रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक जिल्हा परिषदेने मांडला. अध्यक्षस्थानी जिल्हा सौ. अस्मिता कांबळे होत्या. वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण योजनांवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. बांधकाम विभागासाठी सर्वाधिक सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प गुरुवारी सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. चर्चा होऊन तो मंजूरही झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेला अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिलकुमार फड आदी उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की 2021-22 या आर्थिक वर्षांत जिल्हा परिषदेकडे स्वउत्पन्‍नातून जवळपास 41 कोटी 40 लाख 88 हजार 527 रुपये जमा होणार आहेत. तर 21 कोटी 41 लाख 68 हजार 500 रुपये खर्च होणार आहेत. 19 कोटी 99 ल ाख 20 हजार 27 रुपये शिल्‍लक राहणार आहेत. 

दरम्यान, आगामी वर्षांत बांधकाम विभागासाठी सर्वाधिक म्हणजे 6 कोटी 29 लाख 32 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या खालोखाल पंचायत राज कार्यक्रम विभागासाठी 3 कोटी 27 लाख 96 हजार 500 रुपयांची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी केवळ 98 लाखांची तरतूद केली आहे. तर शिक्षण व पाणीपुरवठा विभागासाठी प्रत्येक दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी 1 कोटी 13 लाख 14 हजार, रस्ते व पुलाच्या कामांसाठी एक कोटी 50 लाख 1 हजार, लघु पाटबंधारे विभागासाठी 1 कोटी 8 लाख, कृषी विभागासाठी 1 कोटी 15 लाखांची तरतूद केली आहे. नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी यावेळीही भरीव तरतूद केली आहे. यातून अनेक योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सौ. कांबळे यांनी दिली.


 
Top