उस्मानाबाद/ प्रतिनिधी

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड असोसिएशन अर्थात ‘कैट’ संघटनेेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उमरगा येथे पार पडली. या बैठकीत सचिवपदी लक्ष्मीकांत जाधव तर उपाध्यक्षपदी संजय मोदाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा कैट संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी उमरगा येथील व्यापारी नितीन होळे, भूम येथील संजय होळकर, परंडा येथील अभय देसाई, वाशी येथील नाना शिंगणापुरे, तुळजापूर येथील राहुल साठे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी धनंजय जेवळीकर, निमंत्रक श्यामसुंदर बांगड, नरेंद्र थोबडे, सिद्रामप्पा चिंचोळे, हरीप्रसाद चांडक यांची निवड करण्यात आली. बैठकीत प्रत्येक तालुक्यातून जिल्हा कार्यकारिणी सदस्याची निवड करण्यात आली.

बैठकीत व्यापार्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व या कायद्याचे केंद्र सरकारने सुलभीकरण करावे, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे काम तत्काळ करावे, लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग उमरगा मार्गे नेण्यात यावा, तसेच याचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यास त्वरीत मंजुरी देण्यात यावी, सर्व बँकांमध्ये व्यापार्‍यांसाठी वेगळ्या खिडकीची सोय करण्यात यावी, या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा ज्येष्ठ व्यापारी सिद्रामप्पा चिंचोळे, हरीप्रसाद चांडक, दिलीप गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व तालुका कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top