उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

 विविध तीन गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले पाच जण मागील दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेत संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

यामध्ये नळदुर्ग पोलिस ठाण्यात गतवर्षी दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या बळेवाडी (ता. बार्शी) येथील घरी परतल्याची माहिती एलसीबी पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करून आरोपी अक्षय नामदेव साळुंखे (वय २५) व रत्नाकर सिध्देश्वर दळवे या दोघांना ताब्यात घेत नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या घटनेतील आनंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या घटनेतील आरोपी महादेव लहुजी जाधव (रा. कौडगाव, ता. उस्मानाबाद) हा मागील दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, तो औरंगाबादच्या गारखेडा येथे राहत असल्याची खबर मिळाल्यावरून त्याला तेथून पथकाने ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिसांकडे सोपवले. ही कारवाई एलसीबीचे सपोनि भुजबळ, पोउपनि- भुजबळ, पोहेकॉ- काझी, साळुंखे, ठाकूर, पोना- शेळके, संतोष गव्हाणे, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, सर्जे यांच्या पथकाने केली आहे. तिसऱ्या घटनेत उमरगा ठाण्यात २०१८ मध्ये दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन मारुती बनसोडे व तम्मा मारुती बनसोडे यांना पोलिसांनी गुंजोटी येथून अटक केली.


 
Top