उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी मल्हार आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष सुरेश (सूर्यकांत)कांबळे यांनी केली आहे.

कांबळे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात सर्व जाती-धर्माच्या जनतेसाठी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत लोककल्याकारी कार्ये केली आहेत. त्यांचे आजोळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी असून, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे. ज्या काळात चूल आणि मुल इथपर्यंत महिलांसाठी समाजव्यवस्था मर्यादित होती.त्या काळात अहिल्यादेवी यांनी अनिष्ठ रूढी, परंपरा झुगारून महिलांना मुख्य प्रवाहात आणले. सलग २८ वर्षे लोककल्याणकारी कार्ये करून संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांचे नाव महाविद्यालयाला दिल्यास तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळू शकते. महाविद्यालयाला अहिल्यादेवींचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्याकडेही केल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.दरम्यान, या विषयावर महाराष्ट्रातील धनगर नेत्यांची एकत्रितपणे लवकरच बैठक घेण्यात येणार असून, शासनाकडे यानुषंगाने सर्वांनी मिळून पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.सर्व लोकप्रतिनिधींनीही याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.


 
Top