उस्मानाबाद/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारत’ प्रत्यक्षात घडविण्यासाठी अनेक क्रांतिकारी व सर्वसमावेशक योजना केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट  केल्या आहेत. जिल्ह्यातील अति महत्वाचे प्रलंबित विकास प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने या योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मिळू शकतो. टेक्निकल टेक्सटाईल हब, सोलापूर -तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्ग, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या विषयांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा मागणी व सातत्याने पाठपुरावा करून देखील हे अती महत्वाचे  विषय मार्गी लागत नसल्याची बाब अनाकलनीय असून या महत्वाच्या विषयां बाबत जिल्हयातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी समवेत बैठकीसाठी वेळ देण्याची आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी जिल्हावासीयांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांच्याकडे केली आहे.

  पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व अशा मोठ्या गुंतवणुकीसह आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले व शेतकऱ्यांचे हित जोपासत उत्पनात भरीव वाढीसाठी मदतीच्या घोषणा वित्तमंत्री ना.श्रीमती निर्मला सितारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना केल्या आहेत.  आकांक्षीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा बाबत केंद्र सरकार अतिशय संवेदनशील व सक्रिय आहे असून या जिल्हयांचे ‘championsofchange.gov.in’ या संकेतस्थळाद्वारे ठरवून दिलेल्या मापदंडा नुसार निर्देशकांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष दिले जाते. या योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे विविध उपक्रम एकत्रित करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडविणे अभिप्रेत आहे. 

 केंद्र सरकारने मेगा इन्वेस्टमेंट टेक्सटाईल पार्क  (MITRA ) योजना जाहीर केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी दि. २९/०८/२०१९ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्सटाईल हब उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेशीत केले होते, त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार देखील करण्यात आला आहे, मात्र मागील एक वर्षापासून यामध्ये काहीही प्रगती झालेली नाही. उद्योग खाते शिवसेनेकडेच आहे, उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई साहेब यांच्याकडे देखील अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवलाच जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौडगाव येथे टेक्निकल टेक्सटाईल हब उभारण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणे आवश्यक आहे.

 केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी रू. १,०७,००० कोटींची भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे. सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे जलदगतीने पूर्ण व्हावा, यासाठी   ५० टक्के निधी देण्याचे राज्य सरकारने मान्य केले होते. परंतु वारंवार विनंती करूनही राज्य सरकारच्या ५०% वाट्याचे संमती पत्र रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येत नाही.  नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन योजने अंतर्गत प्रकल्पांची संख्या ६८३५ वरून ७४०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील ७ टीएमसी चे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास रु. ३६०० कोटींची गरज असून हा निधी उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश  नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन योजनेमध्ये करणेबाबत केंद्र सरकार कडे आग्रही मागणी करणे गरजेचे आहे.

  उस्मानाबाद जिल्हयाने शिवसेनेला ३ आमदार व खासदार दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पद देखील शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे जिल्हयातील जनतेला या सरकारकडून मोठया अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री यांचेसह महामाहीम राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून देखील हे अती महत्वाचे  विषय मार्गी लागत नसल्याने जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्रांकडे बैठकीसाठी वेळ मिळण्याची विनंती केली असून जिल्हावासियांना न्याय देण्यासाठी त्यांना अपल्यासामवेत बैठकीसाठी वेळ देऊन उपकृत करावे,  अशी आग्रही मागणी जिल्हावासीयांच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांच्याकडे केली आहे.

 
Top