औरंगाबाद / वृत्तसंस्था-

 नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबविण्याचे निर्देश‍ित करत औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिल्या.  

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्याच्या विविध विकास कामांची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई,रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, माजी खाासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, भयंकर अशा स्वरूपाच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये यंत्रणांनी कौतुकास्पद कार्य केलेले आहे. या संकटावर यंत्रणेच्या पुढाकाराने मात करणे शक्य झाले. त्यातच शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस मोठ्याप्रमाणात राज्यात प्रतिसाद मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिन्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची लावण्यात आलेले स्टीकर्स या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्यास हातभार लागला आहे. अशाच प्रकारचा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली. आजच बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवरासंदर्भात लोणार येथे बैठक घेतली असून त्यासंदर्भात करावयाचे संवर्धन आणि विकास याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. अशाप्रकारचा अमुल्य असा ठेवा आपल्या राज्यात विविध ठिकाणी आहे, त्यांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात यावी. त्याचबरोबर घाटी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या औषधी साठ्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मनपाने आकृतीबंध सादर करावा. शासनाने जिल्ह्यातील गुंठेवारी जमिनीचा प्रशनही सोडविण्याला प्राधान्य दिले. शहराची महत्त्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भराडी-वांगी धरणाबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे यावेळी श्री. ठाकरे म्हणाले.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे वाटत असले तरी मास्कचा वापर करावा. कारण मास्क हीच लस आहे. म्हणून त्याचा वापर प्रत्येकाने करावा. तसेच हात वारंवार धुवावेत आणि शारीरिक अंतर राखावे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

  नैसर्गिक प्राणवायुचा स्त्रोत संवर्धन करणे ही काळाची गरज असून मानवी स्वाथ्यासाठी सर्वात उपयुक्त ठरणारा आहे. त्या पार्श्वभूमीवर अटल आनंद घन वन योजनेंतर्गत विभागात सुरू असलेल्या कामाबद्दल श्री. ठाकरे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच पाणी पुरवठा योजनांची कालबद्ध अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निर्देश यंत्रणांना यापुर्वीच देण्यात आले असून  औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प योजनेतील गुरुत्व वाहिनी व जलकुंभ बांधणी या कामाची पाहणीही मी बैठकीस येण्यापुर्वी केली असल्याचे सांगून निर्देशित कामांची प्रगती पाहण्यासाठी मी वारंवार औरंगाबाद येथे येणार असल्याचे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

पालकमंत्री देसाई म्हणाले, शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्यात शासन, प्रशासन यशस्वी झाले आहे. लवकरच हर्सुल कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शहर कचरा शुन्यतेकडे वाटचाल करेल. जिल्ह्यातील गुंठेवारीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावला आहे, यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले, शहरासाठी 1680 कोटी रुपयांची राज्यातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना राबविण्यास सुरूवात केलेली आहे. शहरात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मनपाला पाठबळ दिलेले आहे. जिल्हा प्रशासनाचा उभारी उपक्रम नाविन्यपूर्ण असा आहे, सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, नागरिकांची त्याला संमती असेल, अशी कामे या जिल्ह्यात चांगले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून होत असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. तसेच औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासनाने कार्यवाही पार पाडावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी प्रशासनाला केल्या.  

मुख्यमंत्र्यांनी याआधी औरंगाबाद जिल्ह्यातील निर्देशित केलेल्या कामांच्या बाबत माहिती देतांना विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अधिकारी नियुक्ती करणे, पैठण औरंगाबाद पाईपलाईन चार पदरी रस्त्यामध्ये जाणार नसल्याचे काम, सिल्लोडमध्ये मक्याचे उत्पादन जास्त प्रमाणात असल्यामुळे सिल्लोड हद्दीमध्ये शासकीय मका हब प्रक्रिया कारखाना सुरू करणे, रब्बी पिक विमासाठी कंपन्या निश्चित करणे, कृषी विभागासाठी रिक्त जागा भरणे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुसूत्रीकरण करणे, अटल भूजल योजनेंतर्गत पाझर तलावाचे रिचार्ज शाप्टचे काम प्रस्तावित करणे, औरंगाबाद जिल्हा परिषदेला नवीन प्रशासकीय इमारत बांधा, वापरा आणि हस्तांरित करा या तत्वावर तपासणे, ब्रम्हगव्हाण उपसा जलसिंचन व शेतकऱ्यांसदर्भात न्यायालयाची परवानगी घेऊन भूसंपादन करणे, ट्रान्सफॉर्मरसाठी ऑईल उपलब्ध करून देणे, वैजापूर ट्रामा केअर सेंटर बांधकाम पूर्ण करणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. तर अन्य कामे प्रगतीपथावर आहेत, असे यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कोविड 19 आण‍ि लसीकरण, पूरबाधितांना निधी, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, कौशल्य विकास, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा उभारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम, संत ज्ञानेश्वर उद्यान याबाबत सविस्तर सादरीकरण केले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी एमजीएम परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन उभारणे, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढविणे, नेहरू भवन इमारतीचा पुनर्विकास, घनकचरा व्यवस्थापन, संत एकनाथ रंग मंदिर अद्यावत करणे, मुख्यमंत्री शहरी सडक योजनेतून 152 कोटींचे रस्ते, माझी वसुंधरा अभियान, मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्णत्वातील प्रकल्प आदींबाबत सविस्तर सादरीकरण केले. सामाजिक संस्थेच्या श्रीमती मेघना बडजाते यांनीही गुलशन महल परिसरात राबवण्यात येत असलेल्या घनवन योजनेबाबत पर्यावरणावर सादरीकरण केले.

बैठकीच्या सुरूवातीला पोलिस दलातर्फे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन कोमल औताडे यांनी केले. आभार अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी मानले.    

 मराठवाडा इकोलॉजिकल टेरियर्सच्या त्रैमासिकाचे विमोचन

मराठवाडा इको टेरियर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील वृक्ष लागवडीवर आधारीत ‘प्लांटेशन ॲचिव्हमेंट’ या त्रैमासिकाचे विमोचन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी छावणीचे कमांडिंग अधिकारी कर्नल पी. व्यंकटेश यांच्यासह सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 
Top