उस्मानाबाद / प्रतिनिधी-
ढोकी व परिसरात कायापालट व्हावा, उद्योग धंदे वाढावेत, शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावे, यासाठी जुन्या लोकांनी अथक परिश्रमाने उभारलेला तेरणा सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद आहे. कारखाना बंद असल्यामुळे परिसर व परिसरातील शेतकरी सभासद, उद्योंगधदे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी सरकार ने मदत करावी, नाहीतर कारखाना चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया करावी, परंतु निविदा प्रक्रिया करण्यासाठी कामगारांचे पीएफ बाकी असल्याचे कारण सांगितले जाते. राज्यातील ५० साखर कारखान्याचे पीएफ बाकी असतानाही त्यांच्या निविदा कशा निघाल्या असा सवाल तेरणा संघर्ष बचाव समितीचे अॅड. अजित खोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी सर्वपक्षीय समिती सदस्य गफार काझी, सतिश देशमुख, आमोल समुद्रे, आनंद देशमुख, राहुल वाकुरे आदी उपस्थित होते.
अॅड.अजित खोत यांनी तेरणा कारखाना हा मराठवाड्यातील सर्वात जुना साखर कारखाना आहे, असे असतानाही तो भंगारात काढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष समिती स्थापन केली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन २० फेब्रुवारी पर्यंत आम्हाला कांही आश्वासन मिळते का ? हे पाहून २२ फेब्रुवारीपासून ढोकी व परिसर बंद ठेवून साखळी उपोषण सुरू करणार आहोत. तेरणा कारखाना चालविण्यास देण्यासाठी निविदा काढण्याची मागणी केली असता, अगोदर कामगारांचे पीएफ भरा, नंतरच परवानगी मिळेल असे सांगितले जात आहे. परंतू नगर व इतर जिल्हयातील ५० साखर काखारखान्याचे पीएफ भरणे बाकी असतानाही ते कारखाने चालविण्यासाठी त्यांच्या निविदा कशा निघाल्या, असा सवाल ही केला. तेरणा कारखाना चालू करण्यासाठी कोणताही पक्षभेद न ठेवता प्रयत्न करणार असून खासदार व सर्व आमदारांना भेटणार असल्याचे सांगितले. सध्या तेरणा कारखान्याकडे जिल्हा बँकेचे ३०० कोटी येणे बाकी आहे. कारखाना चालू केला तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ही चांगले दिवस येतील. त्यामुळे कारखाना बंद ठेवण्यांचे नेमक गौंडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित केला.
तर गफार काझी यांनी सरकार ने घेतलेल्या थक हमीतून पीएफचा प्रश्न मिटवावा, असे सांगून वसंतदादा टेक्नीकल इंस्टट्यूट व मिटकॉन यांनी केलेल्या सर्वे नुसार ३० कोटी रुपयामध्ये कारखाना चालू होऊ शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे कारखाना चालू करून ३६ हजार सभासद शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावा, यासाठी अामदार व खासदाराने साथ दयावी, असे आवाहन केले. निवडणुक खर्चासाठी जिल्हा प्रशासनाने तेरणा कारखान्याच्या ५ एकर व १३ एकर जमिनीवर बोजा चढविला आहे. या जमिनीच्या आलेल्या पैशातून निवडणुकीसाठीच खर्च व्हावा, अशी मागणी ही सरपंच आमोल समुद्रे यांनी केली. यावेळी सतिश देशमुख, संग्राम देशमुख, निहाल काझी, आनंद देशमुख, राहुल वाकुरे, राजेंद्र पाटील यांनी आपली मते मांडली.
