वाशी  / शाेयब काझी

शनिवारी तालुक्यातील नृसिंह साखर कारखान्याजवळ अपघात घडवून आणत जखमींच्या अंगावरील सोन लुटणाऱ्या आरोपींपैकी दोन अल्पवयीन मुलांना वाशी पाेलिसांनी मंगळवारी (दि.१६) अटक केली. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन केलेल्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हयात सध्या रस्त्यावरील मारहाण करून लुटण्याचे प्रमाण वाढले आहे.कळंब-येरमाळा दरम्यान जाणाऱ्या ट्रव्हेल्स मधील बँगा ही कांही चोरट्यानी पळविल्या होत्या. दरोडा प्रतिबंधक दल निर्माण केल्यानंतर अशा प्रकारांना आळा बसला होता. परंतू गेल्या कांही वर्षांपासून हे दल बंद केल्याने  जिल्हयात वाटमारी परत एकदा सुरू झाली का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

तेलंगणा राज्यातील केतावत व मूड या  कुटुंबातील ५ सदस्य शनिवारी शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील इंदापूर परिसरामध्ये पहाटे ३ वाजेच्या सुमारास पुलाखाली दबा धरून बसलेल्या आरोपींनी धावत्या कारसमोर लोखंडी वस्तू फेकत अपघात घडवून आणला होता.गाडी पलटी झाल्यानंतर जखमी महिलांच्या अंगावरील तीन लाखांचे सोने हिसकावून घेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामधील चार जण गंभीररीत्या जखमी आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. मागील तीन दिवसापासून पथकाद्वारे आरोपींचा कसून शोध सुरू होता. पथकाच्या या शोध मोहिमेला मंगळवारी काहीअंशी यश प्राप्त होत याच परिसरामध्ये असलेल्या लक्ष्मी पारधी पेढी येथून दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून या घटनेत चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी दीड तोळे सोनेही हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अन्य आरोपी व मुद्देमाल लवकरच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने ताब्यातील आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. या तपास पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे माने,पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.


 
Top