उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ठिक-ठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री खुलेआमपणे सुरु आहे. याकडे पोलिस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णतः व अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून अवैधरित्या मद्य विक्री तात्काळ थांबवून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद ग्रामीण तालुका परमिट (FL- lll) रूम असोसिएशनच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक ‍यांच्याकडे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आम्ही शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री करीत आहोत. परंतू उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात, धाब्यावर, हॉटेलमध्ये व पान टपरीमध्ये राजरोसपणे अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय चालू आहे. तो अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बंद करण्यासाठी दि.६ जानेवारी, दि.८ जानेवारी व दि‌. २८ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. परंतू राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागामार्फत जुजबी कारवाई केली जाते. मात्र प्रत्यक्षात धाबा मालकाला किंवा अवैद्य मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे नोंद होत नाहीत. त्याऐवजी ते गुन्हे फक्त रोजंदारी काम करणाऱ्या कामगारावर होतात. त्यामुळे अखंड असा हा अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय फोफावत आहे. जेथे जेथे अवैध मद्य विक्री होते. तेथे परराज्यातील बनावट मद्य विकले जात असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडतो. अधिकृत मद्य विक्री दुकानदाराकडून मद्य विक्री झाल्यास व अवैध मद्य विक्री बंद झाल्यास निश्चितपणे शासनाचा महसूल वाढेल याचा गांभीर्याने विचार करून संबंधित अवैध मद्य विक्री बाबत निश्चित धोरण करून हॉटेल चालक, ढाबा मालक व जागेचा मालक या लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून शासनमान्य मद्य विक्री परवानाधारकास न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र आवटे, उपाध्यक्ष तानाजी माळी, सचिव दिवाकर भड व संजय धाकपाडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 
Top