उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या संबंधित विविध प्रश्नांच्या अनुषंगाने जे प्रश्न शासनस्तरावरील आहेत त्याबाबत शासनास लेखी कळविले जाईल, जे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील असतील त्यावर येथेच कार्यवाही केली जाईल, अशा प्रकारे स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न  सोडविण्यासाठी  प्रयत्न केले जातील, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी   दिले.

 निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत आज स्वातंत्र्य सैनिकांसोबत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. या बैठकीस स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष नामदेव जयंतराव माने, स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री दिलीप दत्तात्रय गणेश, वसंत संभाजीराव नागदे, बुबासाहेब जाधव, विष्णुपंत शं. धाबेकर, दत्तात्रय नागनाथ साळुंके, गुंडू विठ्ठल कारेकर, सोमनाथ सदाशिव बिसले, रघुनंदन सोमनाथ बिसले, भास्कर सांबराव नायगांवकर, पेशकार सौ. वाघमारे आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असलेल्या नस्त्या पंधरा दिवसात निकाली काढण्यात येतील, स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीच्या स्थापनेसाठी पालकमंत्री यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाईल. स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनात वाढ करण्याबाबत, भूमिगत राहुन काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठीच्या अटित सूट देण्याबाबत, बीड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या 375 स्वातंत्र्य सैनिकांपैकी 37 पात्र ठरलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना लाभ देण्याबाबत, मयत स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नींना निवृत्ती वेतन मिळण्याबाबत, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना नौकरीत कोटा निश्चित करुन शासन सेवेत घेण्याबाबत, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा कर माफ करण्याबाबत शासनास अवगत करण्यात येईल, असेही यावेळी श्री. स्वामी यांनी सांगितले.

 
Top