उस्मानाबाद दि.२८ (प्रतिनिधी) -  आयोध्यामध्ये श्री राम मंदीर बांधकामासाठी सर्वत्र निधी संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत १ कोटी ३६ लाख ८४ हजार ४५ रुपये निधी जमा झाला असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी निर्माण निधी संकलन समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दि.२८ फेब्रुवारी रोजी देण्यात आली.

शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील के.टी. पाटील बी. फार्मसी महाविद्यालयामध्ये परिषदेत सदरील माहिती देण्यात आली.

यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष महंत तुकोजीबुवा, अभियान प्रमुख श्रीकृष्ण धर्माधिकारी, सहप्रमुख विजय वाघमारे, श्रीराम पुजारी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चौरे, रास्वसंचे अध्यक्ष अनिल यादव, प्रांत पालक डॉ. सुभाष जोशी, शेषाद्री डांगे आदी उपस्थित होते.  जिल्ह्यामध्ये श्री राम जन्मभूमी निर्माण निधी संकलन अभियानच्या माध्यमातून ४५५ गावांमध्ये शंभर टक्के संकलनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ९८ कुटुंबापर्यंत संपर्क झाला असून  ७ हजार ३१४ कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. यामध्ये ६ हजार २२२ पुरुष व १ हजार ९२ महिलांचा समावेश आहे. तर २७० राम तेरी या घेतले असून ४७ मंडळ समित्या व ५७३ ग्राम समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तर  १३ सद्भाव बैठका घेतल्या असून २८ महिलांच्या बैठका व २३ श्रेणी बैठका पार पडल्या आहेत. त्याबरोबरच ग्रामस्तरावर ५३५ बैठका झाल्या असून तालुकास्तरावर ५१ अशा ५८८ बैठका घेण्यात आलेले आहेत. हे कार्य करण्यासाठी ८२ व्हाट्स अॅप ग्रुप देखील तयार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ५५० कार्यकर्त्यांनी दि.३० डिसेंबर रोजी १४ तास योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
Top