उस्मानाबाद /  प्रतिनिधी  - 

 तालुक्यातील ढोकी येथे असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे हजारो शेतकरी, कामगार व शेतमजूर यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांवर आपल्या घराला कुलूप लावून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. तसेच शेतकऱ्यासह परिसरातील नव्हे तर तीन तालुक्यातील अनेक कुटुंबांना आधारवड ठरलेला हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा या एकमेव मागणीसाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने दि.२२ फेब्रुवारी रोजी कारखाना स्थळावर हजारोंच्या संख्येने पायी रॅली, बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढीत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश सरकारसमोर मांडला आहे. तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा कारखानास्थळी धडकला.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे मराठवाड्यातील  पहिला व सर्वात मोठा सहकारी तत्त्वावरील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १३ वर्षापासून बंद  आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना गाळपासाठी ऊस घालण्यास विविध अडचणी उद्भवत आहेत.  हा कारखाना बंद झाल्यामुळे सर्वावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने या कारखान्यासाठी जाहीर केलेल्या थक हमी रकमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ३० कोटी रुपयांचा निधी विना विलंब वर्ग करावा व हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी राज्यातील इतर ५० कारखान्यां प्रमाणे या कारखान्यास परवानगी द्यावी, कारखाना कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम सोलापूर येथील कार्यालयात जमा करावी यासह इतर मागण्यासाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. 

ॲड. अजित खोत म्हणाले की,  १९६७ साली हा कारखाना सुरु करण्यासाठी शिवाजीराव नाडे, किसनराव समुद्रे, तत्कालीन खा. तुळशीराम पाटील यांच्यासह इतरांनी   अथक प्रयत्न केले. तर या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच या भागाचे वैभव फुलले. मात्र हा कारखाना बंद झाल्यामुळे परत ते गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. 

  लक्ष्मण सरडे , शिवाजीराव देशमुख, सतीश वाकुरे, अमोल समुद्रे, सुशील गडकर, निहाल काझी आदींची भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक दत्ता देशमुख  यांनी केले.तेरणा कारखाना सुरू होई पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 
Top