उस्मानाबाद / प्रतिनिधी- बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणेच उस्मानाबादचे वैद्यकीय महाविद्यालयही सुसज्ज व अद्ययावत सुविधांनियुक्त असावे. सिंधुदुर्गप्रमाणे आगामी शैक्षणिक वर्षात उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे जबाबदारी देण्याबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करावा आणि उस्मानाबाद येथे तत्काळ अधिष्ठाता कार्यालय सुरू करून अधिष्ठातांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालय आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत नुकताच बारामती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यास दौरा केला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे शहरवासीयांना दर्जेदार आरोग्यसुविधा मिळाव्यात याकरिता महत्वपूर्ण अशा आग्रही मागण्या केल्या आहेत. 

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या शासन निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आमदार पाटील यांनी अनेक महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले आहे. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत ‘टर्न-की’ तत्वानुसार केले जाणार आहे. अगदी त्याचप्रमाणे उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाबाबतही शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंतीही आमदार पाटील यांनी केली आहे. 

बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यास दौर्‍यात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख तसेच सल्लागार यांच्याशी चर्चा करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे 10 लाख चौरस फूट बांधकामाची आवश्यकता असून सुसज्ज व सुटसुटीत बांधकामासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाची जागा अपुरी आहे. वैद्यकीय महाविद्यालय, वसतिगृहे आणि निवासस्थानासाठी प्रशस्त जागा, परिसर विकासाचे सुयोग्य नियोजन याला पुरेशा जागेअभावी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर जागेचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा प्रथमदर्शी योग्य वाटत असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. शहरालगत इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या शासकीय जागेचा शोध घेण्याबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचित केले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

 
Top