उस्मानाबाद/ प्रतिनिधी
वैष्णोदेवी फूड प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीसाठी दूध पुरवठा केलेल्या सर्व शेतकरी व चेअरमन, दूध संस्था व कर्मचारी यांची थकीत रक्कम तुर्तास प्लांट लिलाव करून प्रथम देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.११ फेब्रुवारीपासून दूध पुरवठा करणारे शेतकरी, दूध संस्था चेअरमन व कर्मचाऱ्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.
वैष्णोदेवी फुड्स प्रॉडक्ट प्रा.लि.चे सर्व संचालक मंडळ, जनरल संकलन अधिकारी व मुख्य हिशोबनीस या सर्वांकडून आमची फार मोठी फसवणूक झाली असून आम्ही सर्वांनी विश्वास ठेवला होता. कारण या कंपनीचा एकमेव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील सर्वात मोठी पावडर निर्मिती प्लांट आहे. या संचालक मंडळाने शेतकरी, कर्मचारी, शासन व बँक यांची देखील मोठी फसवणूक केलेली असताना त्यांना जामीन मिळाल्याने ते मोकाट फिरत आहेत. या प्रकारास दीड वर्षांपेक्षा जास्तीचा अवधी झाला असून आमची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही कंपनी दिवाळखोरीत निघाली असून कंपनीचा तूर्तास प्लांट लिलाव करून प्रथम आमची थकीत रक्कम देण्यात यावी. तर मनी लॉन्ड्रिंग व आर्थिक फसवणूक हा गुन्हा वैष्णोदेवी फुड्स प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व संचालक मंडळ, मुख्य हिशोबनीस, मुख्य संकलन अधिकारी व जनरल मॅनेजर यांच्यावर दाखल करून कठोर कारावासाची शिक्षा देण्यात यावी तसेच यापुढे कोणत्याही शेतकऱ्याची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये असा कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणासाठी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, संजीवनी डेअरीचे चेअरमन अमेय पाटील, मंगळवेढा येथील रोहिणी ॲग्रोटेकचे बाळासाहेब शिंदे यमाई व मानगंगा दूध संघाचे हरिदास गावडे, सद्गुरु दूध संस्थेचे विष्णू नरळे, राजमाता दूध संस्थेचे तानाजी जाधव, महावीर जाधव, अमर पाटील हाडोगिकर,पोपट गोरे, नरसिंग खैरे, सुदाम गीते, हरिदास गायकवाड, अमर माने, सचिन फुलवणे, किरण तोडकरी, जनक केंडे, दत्तात्रय दंडनाईक, खंडू लेंडवे, विठोबा पुंदळे, किशोर मुळे, अल्ताफ तांबोळी, भैरवनाथ सुकलकर, अमोल गायकवाड, दत्तात्रय सानप, नानासाहेब गोपाळधर, राजेश्वर पटवारी, अरुण लोंढे, गणेश यमगर, दीपक देशमुख, हनुमंत पाटील, आदिनाथ भालविठ्ठल, प्रशांत गरड, बाळासाहेब गपाट, सुशेन जाधव, राजेंद्र ढेकणे, सुमित कोळगे, मारुती पिसे आदीसह इतर या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.