उमरगा/ प्रतिनिधी
उमरगा शहरात चोरी, गुंडागर्दीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आठवडी बाजारात मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. गेल्या काही दिवसापासून भुर्टे चोरांनी शहरात उछाद मांडला आहे. अशा घटनाना पायबंद घालण्यास पोलीस यंत्रणा कमजोर दिसून येत आहे. यातच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरांचा शोध घेणे जिकरीचे झाले आहे.
उमरगा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर व सिमावर्ती भागातील मोठे शहर आहे. येथे वैद्यकीय सुविधांची सोय असल्याने विविध आजारांवरील उपचारासाठी तालुक्यासह कर्नाटक राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. शहरात असलेली कापड लाईन, बांधकाम साहित्याचे व्यापारी, होलसेल किराणा दुकान, शेती आवश्यक अवजारे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक येतात. मात्र शहरातील चोरी व गुंडागर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उमरगा येथील एक व्यावसायिक तरुण व त्याचे मित्र शहरातील मुख्य रस्त्यावरून चहापान करून येत असताना फिल्मी स्टाईलने दोन तरुण मोटारसायकल वरुन आले व चालत जाणाऱ्याच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळून गेले. त्यांच्या पाठलाग केले असता ते पळून जान्यात यशस्वी ठरले. तर दोन दिवसांनी येथील एक नागरी बॅंक, एक इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय व शेजारील एक घर अशा तीन ठिकाणी कुलूप तोडून चोरी झाली. यात चोरट्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही. तर याच इमारतीच्या गेटचे कुलूप तोडण्यात आलेले दिसून आले. तर आठवडी बाजारात किमान ८/१० तरी मोबाईल चोरीला जात आहेत. पोलीस चोरीची तक्रार न घेता केवळ सिम कार्ड हरवल्याची नोंद करत असल्याने चोरटयांना बळ मिळत आहे.
शहरातील इंदिराचौक भागात तर स्थानिक व्यापारी ,नागरिक गुंडाच्या दादागिरीला व चोरट्याच्या त्रासाला वैतागून गेले आहेत . ह्या गुंड प्रवृत्तीच्या टोळ्क्याला पोलिसांची कसलीही भीती नाही. हे चार पाच जनाचे टोळके असून यांच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळत आहे .
शहरात वर्दळीच्या ठिकाणी किरकोळ कारणावरून भांडणे होतात. ह्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिक, महिलांना होत आहे. पोलिसांचा वचक दिसून येत नाही. गुन्हेगारी वृत्तीचे व सराईत गुन्हेगार मोकाट आहेत. विनाकारण झंझट नको म्हणून नागरिक तक्रार करण्यास पोलिसात जात नाहीत . जनतेमध्ये पोलिसांनी विश्वास निर्माण करून अशा सराईत गुन्हेगारांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे.