उस्मानाबाद / प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील लिंबी चिंचोली येथील पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  व राज्य विद्युत पारेशन कंपनीने अतिउच्च दाबाची वीज वाहून नेण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतात उंच मनोरे उभे केले.  तसेच सुयोग ऊर्जा नामक कंपनीनेही पवनचक्की उभारताना शेतकर्‍यांना मोबदला देण्यात भेदभाव केला. हा भेदभाव मान्य नसल्याने बाधित शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शेतकर्‍यांनी येत्या 23 फेब्रुवारीला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

सोमवारी बाधित शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून आपली कैफियत मांडली. शासनाच्या नियमाप्रमाणे जिरायती व बागायती क्षेत्रासाठी असलेला योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळणे अपेक्षित आहे. टावरच्या चार  पायातील जमीन बाजारभावाप्रमाणे न पकडता समृध्दी महामार्गाप्रमाणे चारपट रक्कम मिळणे योग्य असताना शेतकर्‍यांना अत्यल्प मोबदला देवून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. वीज वाहिनी ज्या भूभागावरून जाते, त्या जमिनीची 64 मीटरची किंमत शून्य होते. त्याचा मोबदला समृध्दी महामार्गाप्रमाणे जिरायत, बागायत प्रमाणे द्यावा, अशी मागणी होत आहे. या जमिनीत विहिर, मोबदला, बोअरवेल, गोठा, पॉलीहाऊस, शेडनेट, शेततळे, घर करता येत नाही. त्यामुळे जमिनीची किंमत शून्य होते. तसेच फळबाग करता येत नाही. आंबा, चिंच, बोर, नारळ, सुपारी व बांधावर जंगली झाड, शेवगा, सागवान इतरही लावता येत नाही. अशा एक ना अनेक समस्या भविष्यात निर्माण होत आहे. 

तसेच ज्या शेतकर्‍यांनी काम अडविले, त्यांना एका पोलसाठी एक लाख रूपये तर काहींना केवळ 75 हजार रूपये दिले. त्यास अकाऊंटवर कंपनीने रक्कमही अदा केली. जर एका पोलसाठी 75 हजार रूपये मोबदला दिला जाऊ शकतो, तर अन्य शेतकर्‍यांना कमी प्रमाणात का दिला? सर्व शेतकर्‍यांना समान मोबदला दिला पाहिजे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कंपनीस बोलावून घेवून अधिक मोबदला मिळालेल्या शेतकर्‍यांप्रमाणे तसाच मोबदला मिळवून द्यावा अन्यथा कंपनीचे पोल उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देवूनही शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे उमरगा, लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांना न्याय देत समान मोबदला द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. 

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पोलीस अधीक्षक, खासदार, आमदार यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर बाधित शेतकरी अ‍ॅड. आशिष पाटील, दिनकर पाटील, वसंत लवटे, चंद्रकांत गामाती, राजाभाऊ इंगळे, भक्तावर सय्यद, अकील सय्यद, पैगंबर शेख, शेषेराव गायकवाड, संजय माडजे, राजेंद्र मुळे, संजय सोमवंशी आदी शेतकर्‍यांची स्वाक्षरी आहे.

 
Top