शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या माळेला शनिवारी (दि.२३) तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. रथात स्वार तुळजाभवानी मातेचे दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. तर रात्री उशिरा देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
सकाळच्या मानाच्या यजमानांच्या सिंहासन पूजेनंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारतीनंतर अंगारा काढला. यावेळी महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, यजमान बळवंत कदम दांपत्यासह सेवेकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी पहाटे चरणतीर्थ पुजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तर सकाळी ६ वाजता अभिषेक पुजेस प्रारंभ करण्यात आला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर रात्री १० च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला. तुळजाभवानी मातेची चांदीची मूर्ती छबिना वाहनात ठेवून संबळाच्या कडकडाटात प्रदक्षिणा मार्गावर एक प्रदक्षिणा काढण्यात आली. या वेळी यजमान कदम यांच्यासह पुजारी, सेवेकरी, भाविक, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळच्या अभिषेक पूजेनंंतर तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. दैत्याचा संहार केल्याबद्दल भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा बांधली जाते. दोन्ही नवरात्रासह रथसप्तमी दिनी, अशी वर्षातून तीन वेळा तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात येते.
