उमरगा / प्रतिनिधी

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध निघाल्या आहेत. मोठा राजकीय वारसा असलेल्या मुळजमधील कट्टर विरोधक एकत्र आले आहेत तर बलसुरच्या होम स्पीचवर दाजींनी बाजी मारली आहे. मुळज व बलसुर बिनविरोध निघाल्याने राजकीय पंडीतांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर उर्वरीत ३८ गावात गावात आता निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. यामुळे आता गावपातळीवरील गावपुढा-यांचा कस लागणार आहे.

कोरोनाच्या प्रकोपानंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गावचा कारभार हाकण्यासाठी गावागावातुन मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती. ३० डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. तर ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी चार दिवसाची मुदत देण्यात आली होती. या काळात अनेक गावात निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी बैठकांचे फड रंगले. तडजोडीमध्ये इच्छुकांची मनधरणी करुन पुढील निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन आदीसह अनेक आश्वासन देऊन निवडून बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये उमरगा तालुक्यातील मुळज, बलसुर, मातोळा, जकेकुर, जकेकुरवाडी, चिंचकोटा, एकोंडी- एकोंडीवाडी, कोळसुर (गु), पळसगाव, भिकारसांगवी, बाबळसूर या आकरा गावची निवडणूक बिनविरोध काढण्यात यश मिळाले. तर तुरोरी, गुंजोटी, पेठसांगवी, दाळींब, कदेर, नाईचाकुर, तलमोड, दाबका, बेडगा, कुन्हाळी, कोळसुर (क.), समुद्राळ, वागदरी, जगदाळवाडी, कवठा, गुरुवाडी (चें.), डिग्गी, व्हंताळ,  कराळी, रामपूर, दगड धानोरा-मानेगोपाळ, सुपतगाव, हिप्परगा राव, भगतवाडी-कोळेवाडी-चिरेवाडी, मुरळी, थोरलीवाडी, सावळसुर, कदमापूर-दुधनाळ, गणेशनगर, नाईकनगर (मु.), काळालिंबाळा, गुगळगाव, जवळगा बेट, बोरी, नागराळ, कडदोरा, हंद्राळ व आष्टा ज. या ३८ गावांत निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.

 
Top