उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - राज्य सरकारने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली हा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून तो सर्वसामान्यांच्या हिताचा असल्यामुळे त्याची प्रभावीपणे अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी. तसेच उस्मानाबाद शहरात भुयारी गटार करण्यास तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देणार असल्याचे आश्वासन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१६ जानेवारी रोजी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज झालेल्या बैठकीत नगर परिषद, नगर पंचायती यांच्या कामाचा आढावा घेतला असून राज्य सरकारने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियम (युडीसीपीआर) हा अतिशय अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती व सर्वसामान्य नागरिकांच्या विकास कामांवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे यामुळे कृषी व पर्यटन क्षेत्राला निधी वाढवून देण्यात आला आहे. तर जागा अतिक्रमण करण्याचे प्रकार थांबविण्या बरोबरच होणारे अतिक्रमण १०० टक्के रोखले जाणार आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचावेत यासाठी विशेष भर देण्यात येत आहे. तर नगर परिषद व नगर पंचायतीच्या उन्नतीसाठी व विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून नगरपरिषदेने देखील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वत्र आर्थिक चणचण जाणवलेली आहे. त्यामुळे त्याचा उत्पन्नावर थेट परिणाम झाला असून आवश्यक त्या विकास कामासाठी राज्य सरकार मदत करणार असून त्यासाठी प्राधान्यक्रम संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींनी ठरवावा असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या असून शहर हद्दवाढीचे विषय सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगून ते म्हणाले की, उत्पन्न व विकास कामे याचा ताळमेळ बसण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मात्र नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच उस्मानाबाद शहरातील भोगावती नदीचे सुशोभीकरणावर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील वाढलेली डुकरांची संख्या याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेऊन योग्य तोडगा काढणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
