उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील परिसरात   बुधवारी रात्री  पाच कर्मचाऱ्यांना  मारहाण करत त्यांच्याजवळील रक्कम लुबाडण्यात आली. एवढेच नव्हे तर बळजबरीने दारू पाजून याबाबत पोलिसात तक्रार केल्यास पुन्हा तुझ्यासह कुटुंबीयांनाही परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याने सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

माहितीनुसार, सिव्हिल रुग्णालयात विविध वाहनांवर चालक म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी मेजर दिगंबर पवार हे सीएस ऑफिस समोरील जुन्या इमारतीतील एका खोलीतच वास्तव्यास आहेत. दररोजप्रमाणे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सदरील कर्मचारी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसह रूमवर थांबले होते. यावेळी इतर दोन चालकही जेवण करून तेथे गप्पा मारण्यासाठी दाखल झाले.

हे सर्वजण रुममध्ये असताना ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. यावेळी पवार यांनी आतून कोण आहे अशी विचारणा केल्यावर बाहेरून मोठ्याने शिविगाळ करण्यास प्रारंभ होऊन दरवाजावर लाथा मारण्यास प्रारंभ झाला. यामुळे पवार यांनी दरवाजा उघडला असता बाहेरील तिघांनी थेट पवार यांच्यासह आतमधील चालक संदीप जाधवर, बालाजी बांगर, गणेश भालेराव, सुनील मोरे यांना लाकडाने व लाथाबुक्क्या बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला. यावेळी सदरील तिघापैकी एकाने चाकूने वार केल्याने बालाजी बांगर हे जखमी झाले. त्यांच्या पोटाजवळ हा वार झाला असला तरी गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दिगंबर पवार यांना मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्रीच पोलिसांनी पाहणी करून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड तसेच शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तसेच याप्रकरणी दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पक्या, लल्ल्या (पूर्ण नाव माहिती नाही) व अन्य एक अशा तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top