उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

गुरूवार दि. २८ जानेवारी रोजी उस्मानाबाद नगर पालिकेच्या विषय समितीच्या निवडी पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खरमाटे यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, मुख्याधिकारी यलगट्टे उपस्थित होते. विषय समितीच्या झालेल्या निवडीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेचे कांही नगरसेवक राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत आहेत. 

दुपारी विषय समितीच्या निवडीसाठी बैठक सुरू झाल्यानंतर गटनेते युवराज नळे यांनी आजच्या निवडी घेता येणार नाही, उच्च न्यायालयात गटनेत्या संदर्भात प्रकरण चालु असल्याचे सांगून आमच्या निवडी घेता येणार नाही, असा आक्षेप घेतला. पिठासन अधिकारी खरमाटे यांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या आधिन राहूनच आजच्या निवडी होत आहेत.विषय समितीच्या निवडी करू नका, असे न्यायालयाने सांगितलेले नाही, असे सांगून आक्षेप फेटाळला. यावेळी गटनेता म्हणून युवराज नळे यांनी विषय समितीच्या सभापतीसाठीची यादी पिठासन अधिकारी यांच्याकडे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते गणेश खाचरे व शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांनी विषय समितीच्या सभापती व सदस्यांची नावे पिठासन अधिकाऱ्यांकडे दाखल केली.अखेर पिठासन अधिकाऱ्यांनी खोचरे व गुरव यांनी दिलेल्या नावांची यादी जाहीर केली. बाधकाम सभापती पदी प्रदीप गोरे (राष्ट्रवादी), स्वच्छता व आरोग्य सभापती राणा बनसोडे (शिवसेना), शिक्षण सभापती सिध्देश्वर कोळी  (शिवसेना), पाणी पुरवठा सभापती पदी बाबा मुजावर (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनावाली वाघमारे (शिवसेना) तर उपसभापती पदी विद्या एडके (काँग्रेस), नियोजन व विकास समितीच्या अभय इंगळे, स्थायी समितीवर सिध्दार्थ बनसोडे, शिवाजी पंगुडवाले, खलिफा कुरेशी यांची निवड करण्यात आली. 

 
Top