उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासुनच कामाला लागण्याचे अवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यानी शिवसैनिकांना केले. महाविकास आघाडीचे सरकार नुसत्या घोषणा करणारे नाही तर शब्द पुर्ण करणार सरकार असल्याचे सांगुन विरोधकांवर प्रहार केला.पक्षाच्या सभासद नोंदणी शुभारंभ क्रार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे आदीसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते. 

यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,शिवसैनिकांच्या बळावर उभा राहिलेला हा गड अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. सध्या शासनामध्ये आपल्या हक्काची लोक बसली आहेत, त्यांच्या माध्यमातुन जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पुर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यातील वैद्यकीय महाविद्यालयासारखा महत्वाचा विषय मार्गी लावुन हे सरकार फक्त घोषणा करत नाही तर प्रत्यक्षात काम करुन दाखविते याविषयी जनतेलाही विश्वास बसला असल्याचे मत श्री. शिंदे यानी व्यक्त केले. 

पुढे येणाऱ्या नगरपालिका, नगर पंचायती व त्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच निवडणुकामध्ये शिवसेनेची शक्ती वाढणे गरजेचे आहे. हा गड अधिक भक्कम करुन शिवसैनिकाच्या हातात स्थानिक संस्थाचा कारभार  आल्या पाहिजे यासाठी तयारीला लागण्याचे अवाहन श्री. शिंदे यानी केले. नगरपालिका व नगरपंचायतीच्या कोणत्याही अडचणी असुद्या त्या सर्व मी मार्गी लावतो तुम्ही कधीही माझ्याकडे या मी त्या सोडविण्यासाठीच तिथे असल्याचाही विश्वास त्यानी यावेळी दिला.उस्मानाबादची भूमिगत गटार योजना मंजूर करणार असुन भोगावती नदीच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावालाही मान्यता देऊ,सांडपाण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या योजनेस गती देणार आहे. न.पा.मधील कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. उमरगा येथील पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केल्यास त्यासही लवकर मान्यता देण्याचा शब्द यावेळी मंत्री शिंदे यानी दिला. 

खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, 1992 मध्येच उस्मानाबादची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असते पण ते दुसरीकडेच पळविले गेले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आमचेही वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले आहे. शहरात मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल नसल्याने लातूर-सोलापूरला जावे लागत होते. प्रथम या महाविद्यालयाचा ‘पीपीपी’ प्रस्ताव होता पण, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूर्णत: शासनच  हे महाविद्यालय उभारेल, असे सांगितले आहे.दरम्यान तुळजापूर तालुक्यातील असंख्य युवकांनी यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

 
Top