उस्मानाबाद/ प्रतिनिधी

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये होत आहे. या संमेलनानंतर पुढच्याच महिन्यात एप्रिल २०२१ मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. यंदाचे संमेलन हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे हाेणार असून संमेलनाध्यक्षपदी बाबू बिरादार यांची निवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे हे संमेलन लांबल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह दादा गाेरे यांनी दिली.

देगलूर येथे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन आयाेजित करण्याचा निर्णय साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. संमेलनाध्यक्षपदी बाबू बिरादार यांचेच नाव निश्चित करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. बिरादार यांची निवड गतवर्षीच्या संमेलनातच निश्चित करण्यात आली हाेती. मात्र, गतवर्षी मार्चमध्ये हाेणारे मराठवाडा साहित्य संमेलन कोराेनामुळे स्थगित करण्यात आले. यंदाही कराेनाचे सावट असले तरी एप्रिलपर्यंत परिस्थितीत सुधार हाेईल, असा विश्वास साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना वाटताे आहे. साहित्य परिषदेच्या वतीने सध्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी सुरु आहे. हे संमेलन पार पडल्यानंतर त्वरीत एप्रिलमध्ये मराठवाडा साहित्य संमेलनही आयाेजित करण्याचा निर्णय घेतल्याने साहित्य परिषदेची सध्या संमेलनघाई सुरू असल्याचे दिसत आहे.


 
Top