पाथरूड आणि खेड येथील मृत्यू पावलेल्या कावळ्यांचे तसेच कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिकन व अंड्यांचे सेवन करणे धोकादायक नसून, खवय्यांनी शंका बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
बर्ड फ्लूच्या साथीने मराठवाडा हादरून गेला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातही फ्ल्यूची धास्ती निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील खेड (ता. लोहारा) येथे कावळ्यांचा व पाथरूड (ता.भूम) येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. पुणे तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथे तपासणी झाल्यानंतर दोन्ही ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आले असून, पक्ष्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूसारख्या रोगाचा संसर्ग झालेला नसून, नागरिकांनी शंका बाळगू नये, चिकन तसेच अंड्याचे सेवन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
