उस्मानाबाद / प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसेचे जिल्हासंघटक अमरराजे कदम व जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.०४ जानेवारी २०२१ रोजी कौस्तूभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना पुर्वीप्रमाणेच उस्मानाबाद शहराचे हे नाव बदलून धाराशिव करण्यात यावे याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हैद्राबादचे सातवे निजाम मीर उस्मान जंगबहाद्दूर सिद्दिकी यांनी इ.स.१९०५ साली नळदुर्ग शहराचे जिल्ह्याचे ठिकाण हे उस्मानाबाद शहरास हलवून इ.स. १९१० च्या दरम्यान धाराशिव शहराला आपल्या नावावरून उस्मानाबाद हे नाव दिले. जिल्ह्यातील असंख्य स्थानिक लोकांची साधारण गेली ३० ते ४० वर्षापासूनची उस्मानाबाद शहराचे नाव पुर्वीप्रमाणे धाराशिव करण्याची मागणी अडगळीला पडलेली आहे. उस्मानाबाद शहरातील नगरपालीका,स्थानिक आमदार,खासदार व राज्याचा मुख्यमंत्री हे दुर्दवाने शिवसेनेचे असून लवकरात लवकर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव न झाल्यास संपुर्ण जिल्हाभर मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन घेतले जाईल, असा इशारा ही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे,उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार,तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, तुळजापूर तालुका संघटक उमेश कांबळे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन,सौरभ देशमुख,अक्षय साळवे,वेदकुमार पेंदे, बेंबळी शहराध्यक्ष रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व इतर मनसे सैनिक हजर होते.
